निजामपूर (धुळे): लग्नाचे आमिष दाखवून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना यश आले आहे. महेंद्र दरबार बागुल (वय २२, रा. आयने, ता. साक्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित मुलगी घरात कुणीही नसताना बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी २८ फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा (BNS कलम १३७(२)) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासाने लावला छडा
आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसताना, प्रभारी अधिकारी सपोनि मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. पीडित मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबातून धक्कादायक सत्य समोर आले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४, ६५(१), ८७ आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ४ व ६ नुसार वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.
मुद्देमाल जप्त आणि पोलीस कोठडी
निजामपूर पोलीस पथकाने आरोपी महेंद्र बागुल याला ताब्यात घेऊन अटक केली. गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा फॅशन प्रो (क्र. MH 14 Y 2402) ही दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. ९ मार्च रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड (PCR) मंजूर केली आहे.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



