‘दक्ष पत्रकार संघा’च्या पत्रकार परिषदेत धक्कादायक माहिती उघड;
धुळे (सनी सोनवणे ):धुळे तालुक्यातील अजनाळे येथे शासकीय योजना आणि अनुदानाचे आमिष दाखवून गोरगरीब व अशिक्षित ग्रामस्थांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशांची लूट केली असून, जाब विचारल्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याप्रकरणी एका ‘पोलीस पाटलासह’ अजनाळे येथील पती-पत्नीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या गंभीर प्रकाराची आणि मुजोरीची सविस्तर माहिती ‘दक्ष पत्रकार संघा’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अशी केली फसवणूक
अजनाळे (ता. जि. धुळे) येथील मनिष आण्णा भोसले, त्यांची पत्नी अनुसयाबाई मनिष भोसले आणि सडगाव एहनकवाडी येथील पोलीस पाटील विनोद कांतीलाल पवार यांनी संगनमत करून हा प्रताप केला आहे. या तिघांनी अजनाळे गावातील अशिक्षित महिला व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून ७० हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्याची खोटी बतावणी केली. हे अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांनी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी २० हजार रुपये उकळले. ‘जर आम्हाला पैसे दिले नाही, तर तुमचे बँक खाते आणि येणारे अनुदान कायमचे बंद करून टाकू’, अशी धमकी देऊन त्यांनी भीतीपोटी हे पैसे लाटले.

बँकेत गेल्यावर उघड झाले सत्य
काही ग्रामस्थांनी बँकेत जाऊन अधिक माहिती घेतली असता, शासनाकडून आलेले हे अनुदान थेट लाभार्थ्यांसाठी असून यात कोणत्याही दलालाला किंवा मध्यस्थाला एक रुपयाही देण्याची गरज नसते, तसेच यातील काही रकमेची बँकेला परतफेडही करावी लागते, असे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित नागरिकांनी या तिघांकडे आपले २० हजार रुपये परत मागितले.
पैसे मागितल्यास शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
पैसे परत मागितल्यावर या भामट्यांनी पीडितांना विभत्स भाषेत शिवीगाळ केली. “आम्ही तुम्हाला एक रुपया देणार नाही, आमचे जे उपटायचे ते उपटून घ्या. जर पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला संपवून टाकू,” अशी भयंकर धमकी या तिघांनी दिली. यामुळे गावात आणि पीडित कुटुंबांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यस्थी करणाऱ्यांनाही धमक्या; पोलिसात गुन्हा दाखल
या गुंडगिरीची पातळी एवढी वाढली आहे की, गावातील प्रतिष्ठित नागरिक विनोद ग्यानबा चव्हाण (रा. अजनाळे) यांच्याकडे पीडितांनी आपली व्यथा मांडली होती. मात्र, मनिष भोसले याने थेट विनोद चव्हाण यांनाच मोबाईलवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या वाढत्या गुंडगिरीच्या संदर्भात दि. २६ जुलै २०२६ रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत मांडला अन्यायाचा पाढा
पीडित कुटुंब अशिक्षित असल्याने त्यांना कायद्याचे फारसे ज्ञान नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या या ग्रामस्थांनी अखेर ‘दक्ष पत्रकार संघा’चे संस्थापक अध्यक्ष नागसेन जालम बागुल (बापू बागुल) यांची भेट घेऊन संरक्षणाची विनवणी केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून दक्ष पत्रकार संघातर्फे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत या संपूर्ण फसवणुकीची आणि गुंडगिरीची सविस्तर माहिती माध्यमांसमोर मांडण्यात आली. बापू बागुल यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि आमचे कष्टाचे २० हजार रुपये परत मिळवून द्यावेत, अशी आर्त विनवणी पीडितांनी या परिषदेत केली.
यासाठी पीडितांनी सर्व अधिकार बापू बागुल यांना दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलीस प्रशासन गरिबांना न्याय देणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.







