संसदेला ‘पिकनिक स्पॉट’ बनविल्याचा आरोप; राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी
धुळे:संसदेच्या मकर प्रवेशद्वाराजवळ काँग्रेस खासदारांनी आयोजित केलेल्या कथित ‘चाय पार्टी’च्या निषेधार्थ आज रविवारी धुळे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराणा प्रताप चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि चहा सांडून आपला संताप व्यक्त केला.
संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांच्यासह सुमारे २० खासदारांनी संसद परिसरातील मकर प्रवेशद्वाराजवळ चहा-बिस्किटांचा आस्वाद घेतला. लोकसभा अध्यक्षांनी या ठिकाणी धरणे किंवा प्रदर्शनास मनाई केलेली असतानाही, नियमांचे उल्लंघन करून हा प्रकार करण्यात आला. या कृतीमुळे देशाच्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचा अवमान झाला असून, संसदेला ‘पार्लमेंट पिकनिक स्पॉट’ बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

भाजपची आक्रमक भूमिका
महाराणा प्रताप चौकात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केली. शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
“संसद ही लोकशाहीची सर्वोच्च संस्था आहे. तिची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. मात्र, संसदीय परंपरा धाब्यावर बसवून जो पोरखेळ सुरू आहे, त्याचा आम्ही निषेध करतो,” असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी केले.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती
या आंदोलनात महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, ज्येष्ठ नेते विजू नाना पाच्छापुरकर, हिरामण आप्पा गवळी, जिल्हा सरचिटणीस पवन जाजू, सुनील कपिल यांच्यासह भाजपचे सर्व सेलचे अध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.









