dhule; दोंडाईचा शहरातील राऊळ नगर भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडून १८,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, दोंडाईचा पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ९३/२०२६ नुसार दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी श्री. ओमप्रकाश पंडित सोनवणे (रा. राऊळ नगर, संतोषी माता मंदिराजवळ, दोंडाईचा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८.३० च्या दरम्यान घरफोडी केली होती. या चोरीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक
सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर रितीने सुरू असताना, दि. १३ मार्च २०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली. संशयित आरोपी राजगुरु मोहन पाटील (वय २०, रा. महादेवपुरा, दोंडाईचा) हा चोरीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी नंदुरबार चौफुलीवर उभा असल्याची माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
१८ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीची सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
मंगळसूत्र (२.५१० ग्रॅम): ५,००० रु.
सोन्याची नथ (१ ग्रॅम): २,००० रु.
एअर रिंग (३.६० ग्रॅम): ९,००० रु.
सोन्याचे पॅडल (१.२ ग्रॅम): २,००० रु.
एकूण जप्त मुद्देमाल: १८,००० रुपये.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनि श्रीकृष्ण पारधी व पोलीस अंमलदार प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, संतोष हिरे, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी व हर्षल चौधरी यांच्या पथकाने केली आहे.








