शिरपूर (प्रतिनिधी):
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळसनेर शिवारात शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. बुधवारी (दि. १८ मार्च) करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे ३७ लाख ४५ हजार ९६५ रुपये किमतीचा गांजा आणि अफूचा साठा हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हॉटेल्सच्या आडून सुरू होता काळा बाजार
मिळालेल्या माहितीनुसार, पळसनेर गावाच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या हॉटेल जय बाबारी, जय मातादी ढाबा आणि हॉटेल रामदेव बाबा येथे अमली पदार्थांची साठवणूक व विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने चार पथके तयार करून एकाच वेळी या तिन्ही ठिकाणी छापे टाकण्यात आले.

असा मिळाला मुद्देमाल
या छाप्यात पोलिसांनी २२४.६९९ किलोग्रॅम वजनाचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अमली पदार्थ, गांजाचा चुरा, सुकलेला गांजा, अफूची पावडर (डोडा) आणि अफूच्या सुकलेल्या बोंडाचे तुकडे असा एकूण ३७ लाख ४५ हजार ९६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी जेरबंद
या प्रकरणी पोलिसांनी खालील तिघांना ताब्यात घेतले आहे:
१. भला सोडा भरवाड (हॉटेल जय बाबारी)
२. गोपाळ रघू भरवाड (जय मातादी ढाबा)
३. लाला गांगु भरवाड (हॉटेल रामदेव बाबा)
हे तिन्ही आरोपी चारणपाडा, पळसनेर ता. शिरपूर येथील रहिवासी आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी
शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क), १७(क), २०(ब)(ii)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनील वसावे, पोसई मनोज कचरे, पोसई मिलिंद पवार आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई सुनील वसावे करत आहेत.









