लोहा (प्रतिनिधी):
अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम राबवत असताना, नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने एका आंतरराज्य चंदन तस्करीचा पर्दाफाश केला आहे. लातूरमार्गे मध्यप्रदेशाकडे जाणारा ३६ लाख रुपयांचा चंदनाचा साठा लोहा पोलिसांनी जप्त केला असून, एकूण ५१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून लावला सापळा
लातूरकडून मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरकडे एका आयशर वाहनातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती विशेष पथकास मिळाली होती. या माहितीच्या आधारे, रविवारी ५ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास लोहा ते नांदेड रस्त्यावरील सई हॉटेलजवळ पथकाने सापळा रचून संबंधित आयशर वाहन अडवले.

वाहनात बनवला होता ‘गुप्त कप्पा’
तपासणीदरम्यान सुरुवातीला वाहन रिकामे असल्याचे भासले, मात्र पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता चालकाच्या पाठीमागे ६ फूट उंचीचा आणि ३ फूट रुंदीचा एक विशिष्ट गुप्त कप्पा बनवण्यात आल्याचे दिसून आले. ताडपत्री काढून या कप्प्यात प्रवेश केला असता, तिथे चंदनाच्या लाकडाने भरलेली अनेक पोती आढळून आली.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
चंदन: १,४७० किलो (किंमत ३६,७५,००० रुपये)
वाहन: एक आयशर ट्रक
रोख रक्कम: ११,००० रुपये
एकूण किंमत: ५१,९६,००० रुपये
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलिसांनी तौफिक चांदपाशा देशमुख (चापोली) आणि तुकाराम शेषराव बुंदराळे (आनंदवाडी) यांना जागीच ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून रामदास बुंदराळे, बाळासाहेब जाधव आणि शंकर मानपाडे यांची नावे समोर आली आहेत. या पाचही जणांविरुद्ध लोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय वन अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पांचाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विशेष पथकाचे अभिनंदन
पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी ही धाडसी कारवाई केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उमाप यांनी पथकाचे कौतुक केले आहे.








