न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी मागितली होती लाच; पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील घटना
धुळे: फसवणुकीच्या एका प्रकरणात न्यायालयाकडे सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलीस शिपायासह लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकालाही (PSI) एसीबीने ताब्यात घेतले असून, धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
साईनाथ भानुदास तळेकर (वय ३६ वर्षे, पोलीस उपनिरीक्षक) आणि अविनाश अरविंद सादरे (वय ३१ वर्षे, पोलीस शिपाई, दोघेही नेमणूक – पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन, धुळे) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत एका ३५ वर्षीय व्यक्तीने ३ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या सासूच्या नावे धुळे तालुक्यातील मौजे वलवाडी येथे घर आहे. या घराच्या कागदपत्रांचा गैरवापर करून धुळे येथील एका दाम्पत्याने २०१५ मध्ये एका फायनान्स कंपनीकडून परस्पर ३६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज काढून त्यांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी तक्रारदार यांच्या सासूने संबधित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी धुळे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर तक्रारदार यांच्या सासूच्या बाजूने सकारात्मक अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
या तक्रारीची ३ ऑगस्ट रोजी एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली. यात तळेकर यांनी लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या आवारात सापळा रचण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तळेकर यांच्या सांगण्यावरून पोलीस शिपाई अविनाश सादरे याने तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच घेताच सादरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे आणि अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे (सापळा अधिकारी), पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल (तपास अधिकारी) तसेच पो.ह.वा. राजन कदम, मुकेश आहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि मकरंद पाटील यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
एसीबीचे आवाहन:
भ्रष्टाचार संदर्भात कोणतीही माहिती असल्यास किंवा कोणत्याही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (०२५६२-२३४०२० किंवा टोल फ्री १०६४) संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.









