धुळे, प्रतिनिधी :धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत कुंडाणे (ता. जि. धुळे) येथील शेतातील बंदिस्त घरात सुरू असलेला बनावट देशी-विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे ₹४ लाख १८ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना ५ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कुंडाणे गावाच्या शिवारातील गट क्रमांक १९९/१/३/१/ब मधील बंदिस्त घरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिसांनी सायंकाळी सुमारे ४ वाजता छापा टाकला.

छाप्यात रॉयल चॅलेंज फायनेस्ट प्रीमियम व्हिस्की देशी दारू सुगंधी संत्रा प्रिन्स संत्रा या नावांनी बनावट लेबल लावलेल्या हजारो दारूच्या बाटल्या, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, बुच, लेबले, पॅकिंग मशिन, वॉटर प्युरीफायर, पाण्याच्या टाक्या, ड्रम तसेच सुमारे १,००० लिटर दारूचा वॉशअसा एकूण ₹४,१८,१६५किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल भालचंद्र पाटीलयांच्या फिर्यादीवरून इरफान रऊफ पटेल (वय ४१, रा. मोगलाई चर्चजवळ, साक्री रोड, धुळे) याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५५/२०२६नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम १९४९ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकुमार पवार पोलीस कर्मचारी कुणाल पानपाटील, मनोज बावीस्कर, संदीप शिंदे, प्रविण धनगर, पंकज पाटील, विजय वायसे, विशाल पाटील, मंगलदार कोकणी आणि अशोक पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करीत आहेत.








