वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. सावता महाराज वसेकर यांची प्रमुख उपस्थिती
धुळे:प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानिमित्त उद्या, गुरुवार दिनांक १९ मार्च २०२६ रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धुळे शहरात भव्य ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांची परंपरा लाभलेली ही शोभायात्रा सर्व जाती-पाती आणि पक्षभेद बाजूला सारून हिंदू ऐक्य, संस्कृती आणि धर्माचे दर्शन घडवणारी ठरणार आहे.
प्रमुख आकर्षणे आणि पथके
या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे तीर्थक्षेत्र अरण येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे १९ वे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर (अध्यक्ष, श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट) यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाद लाभणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध पथके सज्ज झाली आहेत:

उज्जैनचे डमरू पथक: महाकाल नगरीतून विशेष रितीने बोलावलेले डमरू पथक नादाने परिसर दुमदुमवून सोडेल.
शौर्य व ढोल पथक: वरणगाव येथील शौर्य पथक आणि सोनगीर येथील ढोल पथकाचे सादरीकरण होणार आहे.
सजीव देखावे: हिंदू समाजाला प्रेरणा देणारे विविध सामाजिक व धार्मिक विषयांवरील सजीव देखावे यात्रेत राहतील.
वारकरी संप्रदाय: महिला व पुरुष वारकऱ्यांचा सहभाग आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही यात्रा निघणार आहे.
ग्रामदैवत एकविरा देवीपासून सुरुवात
शोभायात्रेची सुरुवात धुळ्याचे ग्रामदैवत आई एकविरा मातेच्या चरणांपासून होणार आहे. या सोहळ्यात धुळे महानगरातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सामाजिक व सांस्कृतिक संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सहभागाचे आवाहन
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सर्व नागरिक, महिला आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू संस्कृतीचा हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला योगीराज मराठे, निलेश रुणवाल, निफाडकर गुरुजी, विजय पाच्छापूरकर, भरत देवळे, नानासाहेब हालोर, विनोद सोमानी, किशोर चौधरी, प्रितेश अग्रवाल, उमेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.








